धाराशिव / कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील ड्रग्ज रॅकेटचा उलघडा करण्यात पोलिसांना यश मिळत असुन 2 नवीन आरोपी निष्पन्न झाले आहेत. ड्रग्ज रॅकेटचे बीड व पुणे कनेक्शन समोर आले असुन तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. ड्रग्ज तस्करीत पुरवठा, विक्री करणारे व सेवन करणारे असे तिन्ही घटक पोलिसांच्या रडारवर आहेत. 2 अटक आरोपीची पोलिस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना कळंब कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने सोमवार पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत असुन जिल्हा सरकारी वकील ॲड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील आशीष कुलकर्णी हे कोर्टात बाजु मांडत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीना अटक केली होती. त्यांच्याकडुन 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या.

पोलिसांसमोर ड्रग्जची पाळेमुळे शोधून काढून ती उध्वस्त करणे हे मोठे तपासातील आव्हान असणार आहे. कळंब शहरात ड्रग्ज असल्याची चर्चा गेली अनेक वर्षापासून होती, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर पुष्टी मिळाली आहे. ड्रग्ज तस्करीचा कळंब येथील म्होरक्या कोण ? हे ड्रग्ज कोणाला पुरविले जात होते, कोण कोण याचे सेवन करीत होते यासह अन्य बाबींचा तपास पोलिस निरीक्षक शकील शेख हे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी तामलवाडी येथे कारवाई करून तुळजापूर येथील ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त केले होते त्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने कळंब येथील रॅकेट उघड केले. पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/26 अन्वये एन डी पी एस कायदा कलम 8(क), 22( ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


 
Top