धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने चंद्रपूर वन अकादमी येथे 24 व 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'मानद वन्यजीव रक्षक अभिमुखता आणि संवादात्मक कार्यशाळेत' धाराशिव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. मनोज भारत डोलारे यांनी जिल्ह्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. सलग दोन दिवसांची कार्यशाळा आणि एक दिवसाचा ताडोबा परिसरातील अभ्यास दौरा असा हा तीन दिवसीय उपक्रम अत्यंत उत्साहात आणि माहितीपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यशाळेचे शानदार उद्घाटन राज्याचे वनविभागाचे सर्वोच्च अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानद वन्यजीव रक्षकांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ताडोबाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी केले.

या कार्यशाळेदरम्यान मत व्यक्त करताना, प्रा. डॉ. मनोज डोलारे यांनी धाराशिव जिल्ह्यातील वन्यजीवांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडले. जखमी वन्यजीवांवर तातडीने उपचार करण्यासाठी जिल्ह्यात 'वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' म्हणजेच 'वन्यजीव, प्राणी उपचार व निवारा केंद्र' उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, सध्या धाराशिव जिल्हा परिसरात एका वाघाचा वावर दिसून येत असून, त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी आपले मत मांडले. यानंतर कार्यशाळेत वन्यजीव गुन्हे प्रतिबंध, मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापन आणि वन्यजीव बचाव यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर गट चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रा. डॉ. मनोज डोलारे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपले विचार स्पष्टपणे मांडले आणि वन्यजीव संवर्धनाबाबत काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या. राज्यभरातील मानद वन्यजीव रक्षकांशी झालेल्या संवादातून अनेक नवीन गोष्टींची देवाणघेवाण झाली.

दोन दिवसांच्या या संवादात्मक कार्यशाळेनंतर, वनविभागाच्या वतीने सर्व मानद वन्यजीव रक्षकांसाठी ताडोबा जंगलात एक विशेष जंगल सफारी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वांना विविध वन्यजीव आणि पशू-पक्ष्यांचे विलोभनीय दर्शन झाले. यानंतर मोहर्ली गेटजवळील 'श्री रतन टाटा निसर्ग निर्वचन केंद्राला' भेट देऊन सर्वांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, आगरझरी येथील फुलपाखरांच्या उद्यानाला दिलेली भेट विशेष आकर्षण ठरली; जिथे 100 हून अधिक प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरे नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळाली.

कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी सर्व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सहभागी मानद वन्यजीव रक्षकांना त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या संस्मरणीय कार्यशाळेची आठवण म्हणून सर्वांना एक ‌‘ग्रुप फोटो' देखील देण्यात आला. या संपूर्ण तीन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आणि कार्यशाळेचे अत्यंत यशस्वी नियोजन केल्याबद्दल वनविभागाचे, विशेषतः महाराष्ट्र राज्य वनविभागाचे सर्वोच्च अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूरच-ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक प्रभुनाथ शुक्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, ताडोबाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव रायते, अरुणकुमार गोंड, संतोष ठिपे आणि इतर सर्व अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

या कार्यशाळेमुळे भविष्यात वनविभागाच्या समन्वयाने आणि सहकार्याने वन्यजीव संवर्धनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची नवी प्रेरणा मिळाली असल्याची भावना प्रा. डॉ. मनोज डोलारे यांनी व्यक्त केली.


 
Top