भूम (प्रतिनिधी)- पोलीस ठाणे भूम यांच्या वतीने भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तसेच अवैध हातभट्टी चालवणाऱ्या घटकांवर धडक ‘मास रेड' विशेष मोहीम कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसोली, दिंडोरी तसेच भूम शहरातील इंदिरानगर व कल्याणनगर पारधी पिढी या ठिकाणी एकाच वेळी एकूण 10 ठिकाणी धाडी टाकून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी अवैध गावठी हातभट्टी दारू व दारू तयार करण्याचे सडवा रसायन जप्त करून ते जागीच नष्ट केला. यामध्ये गावठी हातभट्टी दारू 275 लिटर एकूण किंमत 27 हजार 500, दारू तयार करण्याचे रसायन 600 लिटर एकूण किंमत 48 हजार रूपये. असे एकूण 875 लिटर रसायन, दारू एकूण किंमत 75 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी 10 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे अवैध धंदे, अवैध दारू विक्री व उत्पादनावर यापुढेही सातत्याने कडक कारवाई करण्यात येणार असून, अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, भूम अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खांडे व पीएसआय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कवडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्ला, पोलीस अंमलदार कलाल, पोलीस अंमलदार कवडे, पोलीस अंमलदार कोरे, पोलीस अंमलदार जाधव यांच्या पथकांनी केली.
