तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र नागनाथ महाराज मंदिराच्या 2026 सालच्या यात्रा महोत्सवाला बुधवार, दि. 12 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेनिमित्त देवस्थान परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेच्या प्रारंभी बुधवारी सकाळी श्री.नागनाथ महाराज मंदिरात खरगे सद्गुरू स्वामी महाराज यांना काकण बांधण्यात येते दरम्यान वसंतपूजा, दुग्धाभिषेक, तैलाभिषेक व जलाभिषेक यांसह विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. धार्मिक कार्यक्रमानंतर सकाळी 9.30 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर सलग पाच दिवस यात्रा महोत्सवाचा उत्साह कायम राहणार आहे. दि. 17 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी यात्रेचा प्रमुख दिवस असून, या दिवशी धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक श्रीक्षेत्र नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी सावरगाव येथे दाखल होतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागनाथ महाराज मंदिरासमोरील शेळीखाली नाग, पाल व इंचू पाच दिवस एकत्रित वास्तव्य करतात. या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे यात्रेदरम्यान दररोज मोठ्या संख्येने भाविक देवस्थान परिसरात दर्शनासाठी गर्दी करतात.
अन्नदात्यांच्या सहकार्याने महाप्रसाद
बुधवारी श्री. नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी राजकुमार माने, शंकरराव अक्कलकोट, रोहित तोडकरी, हरिभाऊ फंड, अरुण फंड, पोपट माळी, कमलमावशी गवळी, रघुनाथ ढोकळे, अंकुश फंड, सुनील फडके. रामचंद्र काशीद व यशवंत कुलकर्णी यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी चंद्रकांत गाभणे, राजकुमार माने, रघुनाथ ढोकळे, दादासाहेब काडगावकर, बाळकृष्ण गवळी, दत्ता बापू कुंभार, बालाजी फंड, दादाराव लगदिवे, उमेश शिंदे व तात्यासाहेब तोडकरी यांच्यासह अन्नदान सेवा समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
