धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. श्रीमती अर्चनाताई राणा-जगजितसिंह पाटील या होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा मा. सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

ेतसेच अर्थ व बांधकाम सभापती मा. श्री सिद्धेश्वर बाजीराव कोरे, समाजकल्याण सभापती मा. श्री गोकर्ण हनुमंत कोकणे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मा. श्री भाऊसाहेब खरसडे, महिला व बालकल्याण सभापती मा. श्रीमती पूजा तुषार शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मा. श्री अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मा. श्री तुकाराम भालके, प्रकल्प संचालक, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, संबंधित कार्यासनावरील अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेची सुरुवात वंदे मातरम्‌‍ यांनी करण्यात आली. त्यानंतर सभेच्या अध्यक्षांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवून त्यास मान्यता दिली. यावेळी माननीय श्री तुकाराम भालके यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले, ज्यामुळे सभेच्या कामकाजाला अधिक शिस्तबद्ध व प्रभावी दिशा मिळाली.

दिनांक 12 मे 2026 रोजी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आलेल्या विविध विषयांच्या अनुषंगाने विभागनिहाय अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. विविध विभागांनी शासनाच्या योजना, विकासकामे आणि प्रलंबित विषयांबाबत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती सभेसमोर मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या, प्रलंबित कामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच विकासकामांशी संबंधित प्रश्न सभागृहात उपस्थित केले. संबंधित विभागांनी या विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांमध्ये जिल्हा परिषदेच्या विकासकामांना गती देणे, प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करणे, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश होता. यावेळी सभेच्या अध्यक्ष मा. श्रीमती अर्चनाताई राणा-जगजितसिंह पाटील यांनी सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुखांना सक्त सूचना देत प्रलंबित कामांचा आढावा घेऊन ती कामे अत्यंत जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश निर्गमित केले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत याची दक्षता घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

सभेदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच लोकाभिमुख प्रशासन, विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, योजनांची गती वाढविणे आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. सभेच्या शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेची अधिकृत सांगता केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली.

 
Top