धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता आकाशाची मर्यादा राहिलेली नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नासास्थळीय परीक्षेत अंतिम निवड झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व 20 गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना ही अविस्मरणीय संधी उपलब्ध होत आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्राथमिक,धाराशिव यांच्या नासास्थळीय परीक्षेतील अंतिम निवड यादीत भूम,परंडा, धाराशिव,उमरगा,कळंब,लोहारा, तुळजापूर आणि वाशी या तालुक्यांतील 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे. काही विद्यार्थ्यांनी गणित,विज्ञान यांसारख्या विषयांतही विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची अजिबात कमतरता नाही; गरज आहे ती त्यांच्या स्वप्नांना योग्य व्यासपीठ आणि संधी देण्याची.धाराशिवच्या या 20 विद्यार्थ्यांची नासाभेट ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्व ठरेल.या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून उद्याचा वैज्ञानिक भारत घडताना मला पाहायचा आहे,” अशी भावना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिवच्या मातीतील या 20 ‘चांदण्यांना' आता अंतराळाच्या विश्वाची सफर घडणार असून, त्यांच्या स्वप्नांना नासाच्या आकाशाची जोड मिळणार आहे.