धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समिती संचलित धाराशिव प्रशाला, धाराशिव आणि स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर, यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप गणेश होते. प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब जाधव, उमाजी देशमुख उपस्थित होते. यावेळी ॲड. सुग्रीव नेरे, जयकृष्ण गरड, अरुण माडेकर, चंद्रकांत माळी, अशोक बोचरे, बालाजी जाधव, धनंजय माळी, इंद्रजीत काळुंखे, सौदागर रोहिदास, धाराशिव प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री भोसले, उषा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका जयश्री भोसले म्हणाल्या की, 15 ऑगस्ट हा केवळ राष्ट्रीय सण नसून भारतीय स्वाभिमान, त्याग, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेत आहोत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रध्वज हा स्वातंत्र्य, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे गौरवशाली प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आणि राष्ट्राप्रती आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
ॲड. सुग्रीव नेरे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ब्रिटिश भारतात कसे आले, बंगालच्या नवाबाच्या पराभवानंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपले पाय कसे रोवले आणि त्यानंतर व्यापार, प्रशासन व राजकीय सत्तेच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले, याची माहिती त्यांनी दिली. 1757 पासून सुरू झालेल्या ब्रिटिश सत्तेला 1947 मध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ संघर्षातून पूर्णविराम मिळाला, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी संघर्ष केला; आता हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणावर भर न देता सर्वांगीण विकास साधला पाहिजे,असे आवाहन ॲड. नेरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांचे त्यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत आणि त्यातील शिस्तीचे विशेष कौतुक करताना ‘जेन झी' आणि ‘जेन अल्फा' पिढीच्या बदलत्या वैशिष्ट्यांवरही त्यांनी भाष्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गणेश यांनी स्वातंत्र्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला. देश स्वतंत्र झाला, हे आपण केवळ पुस्तकांमध्ये वाचतो; मात्र आम्हाला स्वातंत्र्यसैनिकांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत. विद्यार्थ्यांना आता स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून मोठे होऊन देशाची जबाबदारी समर्थपणे पेलायची आहे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षिका बुशरा तांबोळी यांनी हिंदी भाषेतून राष्ट्रभक्तीची संकल्पना, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ कसा आत्मसात करावा आणि आजच्या काळातील स्वातंत्र्याची जबाबदारी काय आहे, यावर प्रभावी मनोगत व्यक्त केले.
धाराशिव प्रशाला आणि स्वामी रामानंद तीर्थ शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून व्यक्त केलेल्या मनोगतांनी उपस्थित मान्यवरांसह सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्' या राष्ट्रगीताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेतली. राज्यगीत, सामूहिक कवायत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले. देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मसलगे यांनी केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. आभार प्रदर्शन रमण जाधव यांनी केले.
