धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आदींसह इतर योजनेंतर्गत आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आवास योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. नुकतीच प्रधानमंत्री आवास योजनेची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. या यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांनी हक्काच्या घरकुल योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.31 ऑगस्टपर्यंत आपली नावे ग्रामपंचायत तसेच आवास प्लस या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केले. मंगळागौरी आगमनानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीचे खेळ दि.1 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, दत्तात्रय देऊळकर, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पचे मेघराज पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या की, 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 8 हजार 232 लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यापैकी 89 हजार 8943 लाभार्थी पात्र तर 19189 लाभार्थी अपात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. त्या याद्यांचे 15 ऑगस्टपासून ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येत आहे. 

 

मंगळागौरनिमित्त विविध कार्यक्रम 

तसेच मंगळागौरीच्या आगमनानिमित्त लेडीज क्लबच्यावतीने महिलासाठी मुंबई येथून मंगळागौरीचे खेळ करणारा एक ग्रुप खेळ सादर करण्यासाठी येणार आहे. विशेष म्हणजे सर्व सख्यांसाठी श्रावण आणि गौरी सणाबरोबरच माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे तसेच सासु-सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य अशा भरगच्च मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन मंगळवार दि.1 सप्टेंबर रोजी लेडीज क्लब येथे सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच सासु-सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट अग आई, अहो आई हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 

 
Top