धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील पिंपरी (बे.) येथे एका 46 वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शेतीचा व्यवहार करून सर्व पैसे उकळल्यानंतरही जमिनीचा ताबा न देता वारंवार जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केल्याने, या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आपले जीवन संपवले. याप्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 31 जुलै 2026 रोजी रात्री 8:00 वाजेपासून ते 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6:00 वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. पिंपरी येथील पांडुरंग मारुती सातपुते (वय 46 वर्षे) यांनी शाहूराज करवार यांच्या शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. मयत पांडुरंग सातपुते यांच्या पत्नी अनिता पांडुरंग सातपुते (वय 40 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महादेव गरड (रा. पिंपरी बे., ता. जि. धाराशिव) याने पांडुरंग सातपुते यांना शेत जमीन विकली होती. जमिनीच्या व्यवहाराचे सर्व पैसे आरोपीने पांडुरंग यांच्याकडून वसूल केले. मात्र, पैसे घेऊनही आरोपी योगेश गरड याने जमिनीचा ताबा दिला नाही. जेव्हा पांडुरंग हे जमिनीचा ताबा मागायला जायचे, तेव्हा आरोपी त्यांना तुच्छ लेखत “तुझी काय लायकी आहे?” असे म्हणत वारंवार जातीवाचक अर्वाच्य शिवीगाळ करत असे. आरोपीच्या या सततच्या छळाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळूनच पांडुरंग यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
पतीच्या आत्महत्येनंतर शोकाकुल झालेल्या अनिता सातपुते यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे: धाराशिव ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.