धाराशिव (प्रतिनिधी)-  जुन्या चांगल्या ट्रॅव्हल्स बसेस देण्याचे आमिष दाखवून आणि विश्वास संपादन करून एका दांपत्याची 17 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने निकृष्ट दर्जाच्या आणि स्वतःच्या नावावर नसलेल्या बसेस देऊन नंतर कागदपत्रे क्लिअर करण्याचे सांगत बसेसही पळवून नेल्या. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 9 नोव्हेंबर 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत जळकोट (ता. तुळजापूर) येथे तसेच मोबाईलवर ही फसवणूक घडली. फिर्यादी उषा पुरुषोत्तम नवगिरे (वय 37 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि त्यांच्या पतीचा आरोपी विनोद विष्णू मुंडे याने विश्वास संपादन केला.“तुम्हाला जुन्या परंतु चांगल्या स्थितीतील ट्रॅव्हल्स बसेस मिळवून देतो,” असे सांगून आरोपीने वेळोवेळी फिर्यादी व त्यांच्या पतीकडून तब्बल 17 लाख 71 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर आरोपी विनोद मुंडे याने फिर्यादीला जुन्या, खराब झालेल्या आणि स्वतःच्या नावावर नसलेल्या ज्यांची कागदपत्रेही क्लिअर नव्हती, अशा ट्रॅव्हल्स बसेस दिल्या. त्यानंतर “बसेसची कागदपत्रे क्लिअर करून देतो” असा बहाणा करत त्याने त्या बसेस पुन्हा स्वतःसोबत घेऊन गेला.

मात्र, आरोपीने कागदपत्रेही क्लिअर करून दिली नाहीत, बसेसही परत केल्या नाहीत आणि घेतलेले 17.71 लाख रुपयेही न देता फिर्यादी दांपत्याची मोठी फसवणूक व विश्वासघात केला. अशा आशयाची तक्रार नवगिरे यांनी 1 ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलिसा ठाण्यात दिली. आरोपी विनोद विष्णू मुंडे (मूळ रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड; सध्या रा. फ्लॅट नं. 105, वासुदेव हाईट्स, कुटे मळा, मानाजी नगर, नऱ्हे, पुणे) यांच्या गुन्हा दाखल केला आहे. 

 
Top