कळंब (प्रतिनिधी)- कळब तालुक्यातील “टी बी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा 2025 ‘हा पुरस्कार वितरणाचा शानदार कार्यक्रम पंचायत समिती येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 26 ग्रामपंचायतीना आपला गाव टीबी मुक्त केल्याबद्दल रौप्य पदकाने व 24 ग्रामपंचायतीना ताम्र पदकाने पदकाने गौरवण्यात आले. तालुक्यातील आठ ग्रामपंचायत सुवर्ण पदकास पात्र असून त्यांना जिल्हा स्तरावर बोलावून गौरवण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा व पुष्पगुच्छ असे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती राजश्रीताई वरपे, उपसभापती प्रणिताताई चव्हाण आणि प्रमुख पाहुणे म्हणुन गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन महिंद्रकर, जि. प. सदस्य उद्धव शितोळे पंचायत समिती सदस्य राणीताई राऊत उपस्थित होते.
या प्रसंगी कर्यक्रमांची प्रस्तावना करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन महिंद्रकर यांनी सांगितले कि टी बी चा संसर्ग होऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रथीनेयुक्त पोषक आहार घेतला पाहिजे म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती सुदृढ ठेवली पाहिजे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीनी याबाबत आणि स्वच्छतेबाबत निश्चितच विशेष प्रयत्न केले असतील त्याबाबत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे गौरवोद्दगार काढले. जिल्हा परिषद सदस्य श्री उद्धव शितोळे यांनी आज रौप्य व ताम्र पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीनी पुढील वर्षी सुवर्णपदक मिळवण्यासाठी कसे प्रयत्नशील राहावे यासाठी मार्गदर्शन केले तसेच क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यासाठी समाजातील जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी, सरपंच तथा पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांनी पुढे यावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सभापती राजश्री वरपे यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत, गावांचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आरोग्य कार्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी विविध गटाचे जि प सदस्य व गणाचे पंचायत समिती सदस्य,संबंधित आरोग्य कर्मचारी आणि सर्व आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पर्यवेक्षक शरदकुमार बोने यांनीकेले. कार्यक्रमासाठी क्षयरोग पथक कळब चे पथक पर्यवेक्षक सुरेश यादव व संतोष बनसोडे व लॅब टेक्निशन दिनेश कावळे, अशोक राऊत, रवी गुजर तथा पंचायत समिती कार्यालयाचे आरोग्य विस्तार अधिकारी बाबुराव जाधव तालुका आरोग्य कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
