धाराशिव (प्रतिनिधी)- पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक स्वरूपात राबविणे गरजेचे आहे. ‘पाणी अडवा,पाणी जिरवा' या मूलमंत्रातून राज्यात जलसंधारणाची चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह', तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत ‘जलसंधारण अभियान' राबविण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 13 ऑगस्ट रोजी जलसंधारण सप्ताह व अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,जलसंपदा विभागाचे तुळजापूर येथील उपअभियंता कल्याणकर,नळदुर्गचे उपअभियंता वाघमारे,मृद व जलसंधारण विभागाच्या तुळजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी सायली जाधव, धाराशिवचे जीवन काकडे,कळंबच्या हर्षिता पाटील तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडविणे,जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे.जलसंधारणाच्या माध्यमातून भूजलपातळी वाढण्यास, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास तसेच पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होते.त्यामुळे जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.लोकसहभागातून जलसंधारणाची कामे अधिक व्यापक झाल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा ग्रामीण तसेच शहरी भागाला होऊ शकतो,असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर' आयोजित करण्यात यावी.या उपक्रमात लोकप्रतिनिधी,अधिकारी- कर्मचारी,विद्यार्थी, क्रीडापटू,स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग सुनिश्चित करावा,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.वॉकेथॉनच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्था,सुरक्षा, आरोग्य सुविधा,पिण्याचे पाणी,स्वच्छता तसेच इतर आवश्यक सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
युवकांना जल व मृदसंधारणाच्या चळवळीशी जोडण्यासाठी 15 ते 19 ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सोइल अँड वॉटर कन्झर्वेशन' ही इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 ते 30 वर्षे वयोगटातील युवकांचा या स्पर्धेत अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालये,युवक मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
‘एक शाळा-एक शोषखड्डा' उपक्रमावर भर देऊन जलसंधारण अभियानाच्या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध,चित्रकला आणि वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात.त्यासोबतच ‘एक शाळाएक शोषखड्डा' हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा.‘एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपणाला चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये पर्यावरण व जलसंधारणाबाबतची जाणीव निर्माण करावी,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण आणि शहरी भागात लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांचे लोकार्पण,वृक्षारोपण आणि जलस्रोत स्वच्छता उपक्रम राबवावेत.या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून जलसंधारणाचा संदेश घराघरांत पोहोचवावा,असे आवाहनही त्यांनी केले. जलसंधारण सप्ताह आणि अभियान हे केवळ कार्यक्रमांचे आयोजन न राहता त्यातून नागरिकांमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व रुजावे आणि जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनावी,यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे,असे जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले.
यावेळी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण दिन आणि जलसंधारण सप्ताह तसेच अभियानाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती श्री.महामुनी यांनी दिली.