भूम (प्रतिनिधी)-  भूम व वाशी पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत दोन वाहनांसह 16 लाख 58 हजार 522 किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे दोन संशयित पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एमएच 23 एयु-5810 व अशोक लेलँड पिकअप क्र. एमएच14 ईएम-5173 या वाहनांचा समावेश होता.तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामध्ये ‌‘गोवा 1000' गुटखा, ‌‘केसरीयुक्त विमल पान मसाला', ‌‘व्ही-1 सुगंधित तंबाखू', ‌‘शॉट 999 सुगंधित तंबाखू' व ‌‘डायरेक्टर स्पेशल पान मसाला' आदी पदार्थांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान 6 लाख 58 हजार 523 किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंदाजे 10 लाख रूपये किमतीची दोन पिकअप वाहने, असा एकूण 16 लाख 58 हजार 522 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी  रोहित दिनेश फंदी यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाणे गुन्हा क्र. 269/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274 व 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही वाहनांमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज असून, वाहनांचे अज्ञात चालक व या अवैध वाहतुकीमागील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक शिंदे, कानगुडे, सपोनि खांडे, सावंत, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, झराड तसेच भूम व वाशी पोलीस ठाण्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.


 
Top