भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील नळी, घुलेवाडी व गिरलगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) नळीवडगाव फाटा येथे भूम-नगर राज्य मार्गावर सुमारे एक तास शांततापूर्ण रास्ता रोको आंदोलन केले. महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.

ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या रस्त्यावरून दररोज शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, दूध उत्पादक, रुग्ण तसेच इतर ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. रस्त्यावरील खड्डे व खराब स्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. रास्ता रोकोदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच तातडीने खडी टाकून कच्च्या स्वरूपाचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

 
Top