भूम (प्रतिनिधी)-   भूम शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कसबा पेठेतील बाणगंगा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंचे लोखंडी संरक्षण कठडे मागील वर्षी आलेल्या महापुरात वाहून गेल्यानंतर तब्बल वर्षभर उलटूनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, या पुलावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, पादचारी, दुचाकीस्वार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

महापुराला एक वर्ष पूर्ण होऊनही पुलाच्या दुरुस्तीकडे नगरपरिषद तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी पुरेसे लक्ष दिले नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील इतक्या महत्त्वाच्या पुलाची अशी अवस्था असणे ही प्रशासनाच्या दुर्लक्षाची बाब असल्याची टीकाही होत आहे. या पुलाबाबत भुम शहर जनशक्ती शहर विकास आघाडीचे अध्यक्ष श्रीमंत विजयसिंह थोरात व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह शहरातील 15 नगरसेवकांनी राज्याचे बांधकाम मंत्री श्रीमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देऊन सदर पुलाला तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

 
Top