धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक (बार्शी नाका) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा लेखी तक्रारी, स्मरणपत्रे व पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनकर वसंतराव मुंडे यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली होती. रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी त्यांनी दि. 25 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026 या कालावधीत उपोषणही केले होते. त्यावेळी नगर परिषद प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी चार महिन्यांच्या आत रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने लोकहिताचा विचार करून उपोषण मागे घेण्यात आले होते.

मात्र, संबंधित प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची मुदत संपूनही अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत दिनकर मुंडे यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर योग्य प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी तसेच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

यासोबतच, जर या निवेदनाची तातडीने दखल घेऊन ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, तर दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या घटनेला प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिनकर मुंडे यांनी प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेचा व जनहिताचा विचार करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

 
Top