धाराशिव (प्रतिनिधी)- काही व्यक्ती केवळ आपले कर्तव्य पार पाडतात, तर काही व्यक्ती आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या 17 वर्षांपासून शिल्प निदेशक (कोपा) म्हणून कार्यरत असलेले किरण प्रकाश झरकर यांनी कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी कल्याण, संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. त्यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

5 सप्टेंबर, शिक्षक दिनाच्या दिवशी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किरण झरकर यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निदेशकाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, छत्रपती संभाजीनगर विभागासाठीही हा प्रथमच राष्ट्रीय गौरव ठरत आहे. त्यामुळे हा सन्मान केवळ किरण झरकर यांचा वैयक्तिक गौरव नसून धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण विभागाच्या कौशल्य विकास क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


कठीण आणि पारदर्शक निवड प्रक्रियेतून राष्ट्रीय निवड 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण आणि गुणवत्ताधारित मानली जाते. राज्यस्तरीय नामांकनानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी, 100 पैकी गुणांकन, पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड, प्रत्यक्ष मुलाखत आणि त्यानंतर अंतिम निवड अशा विविध टप्प्यांतून ही प्रक्रिया पार पडते. राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रातील तज्ज्ञ ज्युरी सदस्य या प्रक्रियेत उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन करतात. किरण झरकर यांनी सलग तीन वर्षे या प्रक्रियेत सहभाग घेतला. सातत्यपूर्ण प्रयत्न, नावीन्यपूर्ण कार्य आणि प्रशिक्षणार्थी केंद्रित उपक्रमांच्या बळावर यावर्षी त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अंतिम निवड झाली.


मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान 

या यशामागे अनेक वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मार्गदर्शक आणि हितचिंतकांचे योगदान असल्याचे किरण झरकर सांगतात. राज्याच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक प्रदीप दुर्गे, सहाय्यक संचालक प्रशांत डोंगरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे, प्राचार्य मारुती बिरादार, प्राचार्य केशव पवार, प्राचार्य संतोष कदम, प्राचार्य संतोष कांबळे, तांत्रिक अधीक्षक चंद्रकांत परदेशी, गट निदेशक सखाराम राऊत, फतेसिंह जगताप, भाऊसाहेब जोगदंड, प्रकाश गाडेकर आणि बाळासाहेब जाधव यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन त्यांच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण ठरले.


सामान्य कुटुंबातून राष्ट्रीय सन्मानापर्यंतचा प्रवास 

सामान्य कुटुंबातून आलेल्या किरण झरकर यांनी कौशल्य विकास क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. हजारो प्रशिक्षणार्थ्यांना ते केवळ विद्यार्थी म्हणून पाहत नाहीत, तर त्यांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारून काम करतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यामध्ये आपला पांडुरंग पाहणारे झरकर आयटीआयलाच आपली पंढरी मानतात.


त्यांचे आजोबा स्वर्गीय अँड. राजाभाऊ झरकर आणि स्वर्गीय देविदास झरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. आई शैला आणि वडील प्रकाश हे वारकरी असून भगवंतभक्त आहेत. सासरे सतीश व सासूबाई सुनीता यांचे आशीर्वाद तसेच पत्नी स्मिता आणि मुले पार्थ व रुद्र यांचे प्रेम, सहकार्य आणि पाठबळ त्यांच्या यशाच्या प्रवासात महत्त्वाचे ठरले आहे.


‌‘व्यवसाय प्रशिक्षण परियोजना' संशोधनातून प्रशिक्षणार्थी हिताला दिशा 

किरण झरकर यांच्या ‌‘व्यवसाय प्रशिक्षण परियोजना' या शोधप्रबंधातून व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि कौशल्य शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उपाययोजनांवर त्यांनी सातत्याने काम केले.

प्रशिक्षणार्थी हितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 500 रुपये करण्याच्या निर्णयातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. संशोधन हे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणावे, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे.


‌‘स्किल बुक'ला भारत सरकारचे पेटंट 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाच्या अधिक प्रभावी संधी उपलब्ध करून देण्यासाठी झरकर यांनी ‌‘स्किल बुक' या संगणक प्रणालीची संकल्पना व निर्मिती केली. कोपा ट्रेडशी संबंधित अभ्याससामग्री, व्हिडिओ, एमसीक्यू, प्रश्नपत्रिका आणि विविध शैक्षणिक साहित्य एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा अभिनव उपक्रम आहे.

‌‘स्किल बुक' या संगणक प्रणालीला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. या नवोपक्रमाची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनीही किरण झरकर यांचा गौरव केला आहे.


कमिंस इंडियाच्या सहकार्याने अत्याधुनिक कोपा प्रयोगशाळा 

प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे यासाठी कमिंस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने धाराशिव आयटीआयमध्ये अत्याधुनिक कोपा प्रयोगशाळा उभारण्यात आली. स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनेल, प्रोजेक्टर, ऑल-इन-वन संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि आधुनिक प्रशिक्षण उपकरणांनी सुसज्ज या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाला प्रत्यक्ष व्यावहारिक कौशल्याची जोड मिळत आहे.


‌‘वंदे मातृशक्ती'मधून मातृशक्तीला कृतज्ञ अभिवादन 

किरण प्रकाश झरकर लिखित ‌‘वंदे मातृशक्ती' हे पुस्तक मातृशक्तीच्या त्याग, संस्कार, ममत्व आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाला समर्पित आहे. 30 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, आचार्य लोकेश मुनी, खासदार बांसुरी स्वराज आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री स्वर्गीय हिराबेन मोदी यांना समर्पित करण्यात आले आहे. ‌‘वंदे मातरम्'मध्ये राष्ट्रमातेची वंदना आहे, तर ‌‘वंदे मातृशक्ती'मध्ये राष्ट्राची भावी पिढी घडविणाऱ्या मातृशक्तीला कृतज्ञ नमन आहे, ही या पुस्तकामागील भावना आहे.


दहा हजार विद्यार्थ्यांच्या आवाजात वंदे मातरम्‌‍ 

‌‘वंदे मातरम्‌‍'च्या सार्थ शताब्दी कार्यक्रमात 10 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम्‌‍ गायन करण्याच्या भव्य उपक्रमात किरण झरकर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


क्रीडा, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माण 

कौशल्य शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्येही झरकर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये 2 हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वृक्षारोपण, नशामुक्ती अभियान, विजय दिवस, कौशल्य दिवस, युवा दिवस, स्वच्छता अभियान, प्रकल्प प्रदर्शने, कॅम्पस इंटरव्ह्यू आणि विविध जनजागृती उपक्रमांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, विविध प्रकल्प प्रदर्शने आणि डीपेक्ससारख्या प्रतिष्ठित प्रकल्प प्रदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठीही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.


लेखन साहित्य आणि संशोधनातून व्यापक योगदान 

किरण झरकर यांच्या नावावर 16 प्रकाशित पुस्तके आणि 3 संशोधन लेख आहेत. कौशल्य शिक्षण, संगणक प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी विकास आणि सामाजिक विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि इतर माध्यमांनी घेतली असून, त्यांच्या नवोपक्रमांची आणि विचारांची माहिती व्यापक समाजापर्यंत पोहोचली आहे.


17 वर्षांच्या तपश्चर्येला राष्ट्रीय सलाम 

गेल्या 17 वर्षांत किरण झरकर यांनी शिक्षक म्हणून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. कौशल्य, नवोपक्रम, संशोधन, साहित्य, तंत्रज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माण या सर्व क्षेत्रांना त्यांनी आपल्या कार्याची जोड दिली.

त्यामुळे “कौशल्य शिक्षणाचा ‌‘किरण' देशभर झळकला” असे त्यांच्या कार्याचे वर्णन करणे सार्थ ठरते. धाराशिवच्या मातीतून सुरू झालेली त्यांची ही प्रेरणादायी वाटचाल आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या 17 वर्षांच्या समर्पित सेवेला मिळालेला राष्ट्रीय सलाम ठरणार असून, धाराशिवच्या कौशल्य शिक्षण क्षेत्रासाठी हा क्षण निश्चितच ऐतिहासिक आणि अभिमानाचा ठरणार आहे.


 
Top