धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या प्रक्रियेत नागरिकांना आपले नाव तपासण्यास तसेच आवश्यक दावे व हरकती दाखल करण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
ग्रामीण, दुर्गम आणि वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना अद्याप एसआयआर प्रक्रियेची पुरेशी माहिती मिळालेली नाही. अनेक मतदारांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे, बीएलओ यांच्याशी वेळेत संपर्क न होणे, स्थलांतरित नागरिक कामानिमित्त बाहेरगावी असणे, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना मतदान केंद्र अथवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी यामुळे पात्र मतदारांना आपले नाव तपासणे व दावे-हरकती दाखल करणे शक्य झालेले नाही.
मतदार यादीत पात्र नागरिकाचे नाव चुकीने वगळले जाणे ही गंभीर बाब असून, प्रत्येक पात्र नागरिकाला आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आणि चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी पुरेशी संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे एसआयआर अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत योग्य ती वाढ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक गावात विशेष एसआयआर मदत केंद्र सुरू करावे, बीएलओ यांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी विशेष सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
मतदार यादीतून कोणाचेही नाव वगळण्यापूर्वी संबंधित नागरिकाला योग्य ती नोटीस देऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. तसेच पात्र मतदारांचे नाव कोणत्याही परिस्थितीत चुकीने वगळले जाणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी आणि गावपातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराचा विचार करून प्रक्रियेसाठी आवश्यक मुदतवाढ देऊन सर्व पात्र नागरिकांना आपले नाव तपासण्याची, दुरुस्ती करण्याची तसेच आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
