भूम (प्रतिनिधी)- ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणे, वाढीव व अवाजवी वीज बिलांची चौकशी करणे आणि स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय महावितरण कार्यालय, भूम येथे धडक मोर्चा काढण्यात आला. आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.
महावितरण कंपनीकडून भूम तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सामान्य वीज ग्राहक, शेतकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रीडिंग किंवा बिलिंगमधील तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहकांवर पडलेला अतिरिक्त आर्थिक भार दूर करून चुकीच्या बिलांचे तात्काळ समायोजन किंवा नुकसानभरपाई देण्यात यावी. तालुक्यातील वीज बिलांच्या वाढत्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष तक्रार निवारण यंत्रणा तत्काळ स्थापन करावी. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्पष्ट लेखी निर्देश द्यावेत आदी मागण्या करण्यात करण्यात आल्या. महावितरण व प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक व लेखी निर्णय घ्यावा. अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने अधिक तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सिराज मोगल, वाशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरसिंह तागडे, रुपेश शेंडगे, ॲड.मुशरफ सय्यद, सोपान वरवडे, समियोद्दीन काझी, मोईज सय्यद, भीमराव देशमुख, घनश्याम लावंड, अण्णा महानवर, सचिन वाघ,महमूद पटेल, लियाकत पठाण, बाशा शेख, कैलास शिंदे, रोहित सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
