धाराशिव (प्रतिनिधी)- माती व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून जनमानसात पाणी आणि मातीच्या संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी राज्यव्यापी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.
१५ ते ३० वयोगटासाठी ‘रील्स’ स्पर्धा
माती व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यव्यापी स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी ३० ते ६० सेकंदांची माहितीपूर्ण रील तयार करून #SaveSoilSaveWater या हॅशटॅगसह सोशल मीडियावर अपलोड करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
रीलसाठी माती संवर्धन, पाणी बचत, मृद्संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण,पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य या विषयांवर रील्स तयार करता येणार आहेत. रील्समध्ये #savesoilsavewater, #savewatersavesoil, #mahawalkathon, #walkforwater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश
“एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी!, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !”
तुळजाभवानी स्टेडियमवर ‘वॉक फॉर वॉटर’
जलसंधारणाचे दूरदृष्टीचे विचार मांडणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकॅथॉन - वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे.धाराशिव येथे शुक्रवार,२१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकॅथॉनला सुरुवात होणार आहे.
‘पाण्यासाठी पाऊल’ (Walk for Water) या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपण सर्वांनी या वॉकॅथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे ,ही विनंती ! चला,जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र पाऊल टाकूया !” असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी केले आहे. वॉकॅथॉनसाठी नोंदणी करण्याकरिता दिलेला QR Code स्कॅन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल वॉकॅथॉनचा मार्ग
तुळजाभवानी स्टेडियम, नगरपरिषद, सेंट्रल बिल्डिंग चौक, संभाजीनगर कमान, रामनगर, आनंदनगर, समता कॉलनी, महात्मा फुले चौक, तुळजाभवानी स्टेडियम या मार्गावरून वॉकॅथॉन काढण्यात येणार आहे. माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
