धाराशिव (प्रतिनिधी)-  किशोरावस्था हा बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करण्याचा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे.या काळात मुला-मुलींमध्ये शारीरिक, मानसिक,भावनिक,लैंगिक, वैचारिक तसेच वर्तणुकीत अनेक बदल घडत असतात.साधारणतः 10 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि विश्वासार्ह माहितीची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम (आरकेएसके) अंतर्गत 'मैत्री ( क्लिनिक' सुरू करण्यात आले असून,धाराशिव जिल्ह्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव,तसेच उपजिल्हा रुग्णालय उमरगा, परंडा, तुळजापूर आणि कळंब येथे मैत्री क्लिनिक कार्यरत आहेत. अनेकदा किशोरवयीन मुला -मुलींना शारीरिक, मानसिक किंवा भावनिक समस्यांविषयी आई- वडील, पालक, नातेवाईक अथवा शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे कठीण जाते.त्यामुळे त्यांच्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. अशा वेळी योग्य व शास्त्रीय माहिती न मिळाल्याने ते चित्रपट, दूरदर्शन, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून मिळणाऱ्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची शक्यता वाढते. यामुळे गैरसमज,चुकीचे निर्णय, व्यसनाधीनता किंवा धोकादायक वर्तन निर्माण होण्याचा धोका असतो.

याच पार्श्वभूमीवर मैत्री क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशकांकडून किशोरवयीन मुला-मुलींना शारीरिक,मानसिक, भावनिक व लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन,पौष्टिक आहाराबाबत माहिती,वैयक्तिक समुपदेशन, विवाहपूर्व मार्गदर्शन,कुटुंब नियोजन साधनांविषयी माहिती तसेच संपूर्ण गोपनीयतेसह आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. किशोरवयीन मुला- मुलींच्या मनातील प्रश्नांना शास्त्रीय, विश्वासार्ह आणि गोपनीय पद्धतीने उत्तरे देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या क्लिनिकमधून केले जात आहे. या सेवांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून,सन 2024-25 मध्ये 15 हजार 279, सन 2025-26 मध्ये 17 हजार 171, तर सन 2026-27 मध्ये जुलै 2026 अखेर 5 हजार 628 किशोरवयीन मुला-मुलींनी मैत्री क्लिनिकच्या सेवांचा लाभ घेतला आहे. 


 
Top