धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात एकूण 594 पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी 593 योजनांना कार्यारंभ देण्यात आला आहे. यापैकी 346 योजना पूर्ण झाल्या असून,60 योजना 0 ते 50 टक्के,तर 187 योजना 50 ते 99 टक्के प्रगतीपथावर आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा (एफएचटीसी) करण्यासाठी जिल्ह्यास 2 लाख 88 हजार 559 नळजोडण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यापैकी 2 लाख 64 हजार 480 नळजोडण्या पूर्ण झाल्या असून,हे प्रमाण 91.66 टक्के इतके आहे.तसेच 533 गावे 'हर घर जल' नोंदीत आली असून, त्यापैकी 297 गावे 'हर घर जल' म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 199 योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.त्यापैकी 120 योजनांना शासनाची मान्यता मिळाली असून,50 प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.उर्वरित 29 प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आवश्यक ते बदल करून प्रस्ताव अंतिम करण्यात येत आहेत.याशिवाय संभाव्य 14 व्या एसएलएससी बैठकीसाठी 75 योजनांचे आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शासनाची परवानगी मिळताच ते सादर करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायतींकडून नव्याने 39 गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत 594 योजनांसाठी 383.21 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी आजपर्यंत 188.37 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून,प्राप्त झालेला संपूर्ण निधी योजनांच्या अंमलबजावणीवर खर्च करण्यात आला आहे. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलतारा उपक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 806 जलतारे,तर पंचायत समित्यांमार्फत लोकसहभागातून 4 हजार 621 जलतारे उभारण्यात आले आहेत. दरम्यान,सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 6 गावांना 8 टँकरद्वारे,तर 71 गावांसाठी 135 विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.


 
Top