धाराशिव (प्रतिनिधी)-  कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यात प्रस्तावित विमानतळाच्या उभारणीला महत्त्वाची गती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश एमएडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांना दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः या प्रकल्पाचे पालकत्व स्वीकारत संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना कपूर यांना दिल्या आहेत. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील विमानतळाचा प्रस्तावाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत विमानतळाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा झाली.  धार्मिक, औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला दीर्घकालीन दिशा व बळ देणारा प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.


 
Top