तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील गट क्रमांक 124 मधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव (सामान्य प्रशासन विभाग) येथून दि. 28 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, शिवसेना तुळजापूर मा.तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीवर ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
तक्रारीत मौजे निलेगाव,ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील गट क्रमांक 124 मधील कथित गैरव्यवहारास जबाबदार धरत तत्कालीन तहसीलदार अरविंद बोंळगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
महसूल मंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना “चौकशी करून नियमानुसार योग्य कार्यवाही करावी“ अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने उपविभागीय अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, तक्रारीसंदर्भातील सर्व कागदपत्रे, लागू असलेले शासन निर्णय, परिपत्रके तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास त्याचाही विचार करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्याची प्रत अर्जदारालाही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशामुळे तुळजापूरमधील गट क्रमांक 124 जमीन प्रकरणाला नव्याने गती मिळाली असून,चौकशीनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
