धाराशिव (प्रतिनिधी)- योगासनाला आता खेळ म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्याने या क्षेत्रातील खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत फिटनेसकडे दुर्लक्ष होत असताना योगासन हा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी प्रभावी पर्याय ठरत आहे. ‘फिटनेससाठी योगासन आणि यशासाठी सातत्यपूर्ण सराव' हा मंत्र प्रत्येक खेळाडूने अंगीकारल्यास भविष्यात धाराशिव जिल्ह्यातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट योगासनपटू घडतील, असा विश्वास धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिव स्वाती गडदे यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम मध्ये आयोजित जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रसंगी धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या सचिव स्वाती गडदे बोलत होत्या. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शिका डिंपल ठाकरे, जिल्हा योगासन संघटनेचे अध्यक्ष अतुल अजमेरा, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, सहसचिव राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, तांत्रिक समिती प्रमुख सुरेंद्र वाले, स्पर्धा संचालक रामकृष्ण खडके, संघटनेचे सदस्य रामेश्वर सावंत, सीमा चौरे, जिल्हा समन्वयक प्रवीण गडदे, पंच डॉ. रविजीत देडे, डॉ. विनोदकुमार वायचळ, डॉ. परवीन मुल्ला, माहिती तंत्रज्ञान प्रमुख यशोदीप कदम, बालाजी खंडागळे आदी उपस्थित होते. तसेच स्पर्धेत सहभागी योगपटू, पंच, मार्गदर्शक, संघटनेचे पदाधिकारी आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजेते व प्राविण्यप्राप्त खेळाडूंची संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.
