धाराशिव (प्रतिनिधी)-  छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. शेतकरी चळवळीशी संबंधित मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना शेतकरी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातील मेजर रामजीवन बोंदर यांची निवड करण्यात आली.

ही बैठक शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्यप्रमुख तथा शेतकरी नेते, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शेतकरी परिषदेचा राज्यभर विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत शंकरअण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे, शेतकरी मेळावे व बैठका घेऊन जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी निवडीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन घेण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला.

मेजर रामजीवन बोंदर हे पदवीधर असून त्यांनी तब्बल 18 वर्षे देशसेवा केली आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा निर्धार करून त्यांनी विविध सामाजिक व राजकीय पदांवर काम करत शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला. अन्यायाविरोधात सातत्याने लढा देत त्यांनी सामाजिक कार्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. बोंदर यांनी यापूर्वी कळंब तालुका अध्यक्ष, भाजप किसान मोर्चा, कळंब पंचायत समिती सदस्य भाजप, कळंब तालुका अध्यक्ष भाजप, जिल्हाध्यक्ष  शेतकरी संघटना धाराशिव, मराठवाडा अध्यक्ष  शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष  वंजारी सेवा संघ धाराशिव तसेच सरपंच, मौजे वडगाव (शि.), ता. कळंब आदी विविध पदांवर काम केले आहे.त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top