धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या नावावर आलेल्या कृषी निविष्ठा मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांचे केवळ निलंबन नाही तर त्यांना तुरुंगात पाठवून लुटलेला प्रत्येक रुपया वसूल केला पाहिजे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
यावेळी कैलास पाटील म्हणाले की,जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वाटपात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आणला. विधानसभेत देखील या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. याबाबत कृषिमंत्री तसेच कृषी विभागाच्या सचिवांकडे अधिकृत तक्रार करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निर्णयाचे आमदार कैलास पाटील यांनी स्वागत केले असले तरी ते पुरेसे नसल्याच पाटील यांनी सांगीतले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या आणि शासनाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही. त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भ्रष्टाचारातून झालेल्या आर्थिक नुकसानीची संपूर्ण रक्कम संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल झाली पाहिजे..
