धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. पाणी आणि माती संवर्धनाची चळवळ केवळ सरकारी उपक्रम न राहता ती जनमानसाची चळवळ व्हावी, या उद्देशाने धाराशिव येथे ‘महा वॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर'चे आयोजन करण्यात आले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात नागरिक, विद्यार्थी, अधिकारी- कर्मचारी, खेळाडू तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जलसंधारणाच्या संदेशाला लोकसहभागाची जोड मिळाली.
धाराशिव येथे शुक्रवार,21 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता तुळजाभवानी स्टेडियम येथून वॉकॅथॉनला उत्साहात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे सुहास चव्हाण, जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अभियंता सायली जाधव, हर्षदा पाटील,जीवन काकडे, शाखा अभियंता ज्योती जाधव, कांचन मलजे आणि बलराम पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सहभागी नागरिकांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकॅथॉनला सुरुवात करण्यात आली. ‘महा वॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर'मधील प्रथम दहा सहभागी विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र, पदक आणि सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. तर आभार वैशाली महामुनी यांनी मानले.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा'चा संदेश
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,पाण्याचे संवर्धन,भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘पाणी अडवा,पाणी जिरवा' हा मूलमंत्र आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे तसेच जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होते. पाण्याचा वापर प्रत्येकाने गरजेनुसार आणि काटकसरीने करणे ही काळाची गरज आहे. 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या पाणी संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी पुजार यांनी केले.
