मुरूम (प्रतिनिधी)- कंटेकुर, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी सैनिक, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आजी-माजी पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व अंगणवाड्यांतील विद्यार्थी व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली. यावेळी विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती देण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला. याशिवाय विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अर्जुन घोसले यांनी शाळेस फॅन भेट दिले व श्री महालक्ष्मी युवक संघटना, कंटेकुर यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ हवा आणि हरित गावासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. युवकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर गुंडेराव हनुमंत साखरे, राधा राम कलबुर्गे आणि श्रीकांत विष्णू शिंदे यांच्या वतीने शाळेतील तसेच गावातील तीनही अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 

 
Top