धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिवचा 22 वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रवीण वक्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक व ‘जीवनसाधना पुरस्कार'प्राप्त योगीराज देवराव वाघमारे, व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, डॉ. अंकुश कदम, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर तसेच विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. वर्धापन दिनाचे औचित्य साधून साहित्य क्षेत्रातील दीर्घकाळच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज देवराव वाघमारे यांना ‘जीवनसाधना पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना योगीराज वाघमारे यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त करून ‘जीवनसाधना पुरस्कार' दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. यावेळी बसवराज मंगरुळे, प्रा. डॉ. प्रवीण वक्ते यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश्वर कळलावे यांनी केले. उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण उपपरिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.
