वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा सारोळा (वा.) या छोट्याशा ग्रामीण शाळेने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेतील चौथीच्या 8 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, शाळेचा 75 टक्के निकाल लागला आहे. यापूर्वी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतही शाळेने उल्लेखनीय यश मिळविले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतही शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत अलंकार अमोल चेडे याने 190 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ अविष्कार मनोज चेडे (186 गुण), कृष्णाली कुमोद चेडे (182 गुण), गौरी रोहन चेडे (160 गुण), प्रणाली सुनील क्षीरसागर (144 गुण) आणि गणेश सदाशिव जाधव (144 गुण) यांनी यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशामागे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक चौधरी ए. एच. यांचे सातत्यपूर्ण नियोजन, नियमित मार्गदर्शन तसेच विषय शिक्षक गवारे व्ही. के. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांची चिकाटी, नियमित सराव, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन या सर्व घटकांमुळे हे यश शक्य झाल्याची भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी तसेच परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील छोट्याशा शाळेने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ही एक उज्ज्वल साक्ष असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 
Top