धाराशिव (प्रतिनिधी)-  विकासकामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहेत, निधीही उपलब्ध झाला आहे आणि कामांना सुरुवातही झालेली आहे. आता कोणतीही कारणे सांगून ती रखडणार नाहीत याची काळजी घ्या. निर्धारित वेळेत सगळी कामे पूर्ण करा. अडचणी येत असतील तर त्यावर उपाय शोधा, कायदेशीर अडथळे असतील तर पर्यायी मार्ग काढा आणि प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट आणि कडक शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना  बार्शी-बोरफळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान निर्देश दिले आहेत.

बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहरातील कामाची गती वाढविण्याचेही निर्देश दिले आहे. केवळ काम पूर्ण होण्याची अंदाजे मुदत सांगून चालणार नाही. पुढील प्रत्येक 15 दिवसांत कोणते काम पूर्ण होणार, याचा ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच केवळ कागदोपत्री प्रगतीऐवजी प्रत्यक्ष कामाच्या वेगावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत.

रस्त्याच्या हद्दीतील वीजवाहिन्यांचे खांब आणि डीपी हे कामातील प्रमुख अडथळे असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अडथळे तातडीने दूर करून संबंधित यंत्रणांनी खांब व डीपी स्थलांतरित करण्याची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत असे आमदार पाटील यांनी सांगितले. धाराशिव शहरातील सुमारे 140 कोटी रुपयांच्या 14 विकासकामांचाही सविस्तर आढावा यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला आहे. यावेळी नगराध्यक्षा नेहाताई काकडे, सतीश दंडनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, मुख्याधिकारी नीता अंधारे, नगरसेवक अभिजित काकडे, अभिजित पतंगे, पृथ्वीराज दंडनाईक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

 
Top