धाराशिव (प्रतिनिधी)- “गजेंद्र (दादा) जाधव मित्र मंडळ, वडगाव सिद्धेश्वर“ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.

कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व ध्वजारोहणाने झाली. यावेळी महामानवाच्या विचारांचा जागर करत त्यांना अभिवादन करण्यात आले. जयंत उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवक व ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. याप्रसंगी वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच जयराम मोरे, आणि ग्रामसेवक सुदर्शन घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमास सिद्धेश्वर भाऊ मोरे, विश्वास मोरे, बापू जाधव, महादेव जाधव, तुकाराम जाधव, काका कांबळे, सौदागर जाधव, दशरथ जाधव, प्रमोद भालेराव, शिवाजी कांबळे यांच्यासह लहुजी ग्रुप व क्रांतिपिता लहुजी साळवे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गजेंद्र (दादा) जाधव मित्र मंडळाचे सर्व सदस्य, लहुजी ग्रुप आणि क्रांतिपिता लहुजी साळवे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाबद्दल सर्व रक्तदात्यांचे व आयोजकांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.


 
Top