तुळजापूर (प्रतिनिधी)- सन 2025 च्या पीकविमा योजनेअंतर्गत सुमारे 12 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे अर्ज तातडीने मंजूर करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तांत्रिक कारणांचा आधार घेत हजारो शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भीमाशंकर इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2025 च्या पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी नियमानुसार प्रीमियम भरला होता. विमा कंपन्यांनी प्रीमियम स्वीकारून पावत्याही दिल्या. मात्र त्यानंतर 'तांत्रिक त्रुटी', 'सीएससी केंद्रातील चुका' यांसारखी कारणे पुढे करत हजारो शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले.

या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी कृषी विभाग आणि सीएससी केंद्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पाठपुरावा केला. त्यावेळी पोर्टलवरील त्रुटी दूर करून अर्ज मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

संघटनेने पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंचनामे होऊनही अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळाली. विमा कंपन्यांनी अपेक्षित नुकसानभरपाई न देता शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.नाकारण्यात आलेले सर्व पीकविमा अर्ज तातडीने मंजूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच आपत्तीग्रस्तांना  वाढीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, शहाजी सोमवंशी, महेश आष्टे, संभाजी पाटील, शिवाजी घोडके, रविकांत कापसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top