धाराशिव (प्रतिनिधी)-  जलसंधारणाला चालना देत जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, धरणे व तलावांतील गाळ काढून त्याचा शेतीसाठी सुपीक माती म्हणून उपयोग करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून शेतीची उत्पादकता वाढविणे,हा 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीस हातभार लावणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सन 2024-25 व 2025-26 मध्ये मंजूर झालेल्या 155 कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नसल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.

28 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार“ तसेच “नालाबांधणीकरण व रुंदीकरण“ योजनेंतर्गत सन 2024-25 व 2025-26 मधील एकूण 155 कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाची 45 तर मृद व जलसंधारण विभागाची 110 कामे समाविष्ट आहेत.पूर्ण झालेली कामे 50 अशासकीय संस्था आणि 5 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात आली असून,त्यात धरणांतील गाळ काढणे तसेच नालाबांधणीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले होते. या विषयी अधिक माहिती मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी दिली.


 
Top