तुळजापूर (प्रतिनिधी)-  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच वृक्षलागवडीचा विक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील मौजे तुळजापूर खुर्द येथील वनक्षेत्र गट क्रमांक 44 मध्ये शुक्रवारी दि. 14 ऑगस्ट रोजी ‌‘हरित धाराशिव अभियान 2.0' अंतर्गत अवघ्या 12 तासांत तब्बल 66 हजार देशी वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करण्यात आली. तुतारीच्या गजरात आणि हलग्याच्या निनादात झालेल्या या उपक्रमाला नागरिकांसह विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‌‘एक पेड माँ के नाम' या संकल्पनेला जोड देत अनेक मान्यवर व नागरिकांनी प्रत्यक्ष वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या विक्रमी वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार बोळंगे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे आणि मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला.

वनक्षेत्र गट क्रमांक 44 मधील सुमारे 2.20 हेक्टर क्षेत्रात 62 विविध देशी प्रजातींची तब्बल 66 हजार रोपे लावण्यात आली. घनवन पद्धतीने करण्यात आलेल्या या लागवडीमुळे भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर हिरवाई निर्माण होण्यास मदत होणार आहे. वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही महत्त्वाची असल्याने प्रशासनाकडून पुढील काळात या रोपांच्या देखभालीवर भर देण्यात येणार आहे. 

या पर्यावरणपूरक उपक्रमात तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, जिल्हा खजिनदार सुरज बागल, सचिन टेले, अहमद अन्सारी, सतीश फत्तेपुरे, अक्षय मोरे यांच्यासह पत्रकारांनी सहभाग नोंदवला.

याशिवाय श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, टाटा सामाजिक संस्था, विविध बँका, शाळा तसेच अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षलागवड केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. परचंडे, आरएफओ शिवानंद कोळी, वनपाल गोविंद माळी, वनरक्षक विनोद पाटील यांच्यासह वन व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजन, रोपांची उपलब्धता, लागवड आणि व्यवस्थापनासाठी मेहनत घेतली.

 
Top