तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह पंचक्रोशीत विविध महामार्ग, रस्ते, रेल्वे आणि अन्य विकासकामांना वेग आला आहे. या कामांसाठी लागणाऱ्या मुरूम व दगडाची मागणी वाढली असताना, त्याचा गैरफायदा घेत पंचक्रोशीतील डोंगर आणि शेतजमिनींमधून मोठ्या प्रमाणावर अवैध गौणखनिज उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
अपसिंगा, सिंदफळ, भातंबरे यासह परिसरातील विविध भागांतील डोंगर फोडून मुरूम व दगड काढला जात असल्याचा आरोप होत असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. उत्खननासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर यांसारख्या वाहनांचा सर्रास वापर होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
108 फुटी पुतळ्याच्या परिसरातही उत्खनन?
तुळजापूर परिसरात प्रस्तावित 108 फुटी पुतळ्याच्या परिसरातील शेतजमिनींमधूनही मुरूम काढला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींमधून मुरूम उपसा होत असल्याने संबंधित यंत्रणेने या भागाची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
वीटभट्ट्यांसाठीही शेतातून मुरूम उपसा
परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांकडूनही आजूबाजूच्या शेतजमिनींमधून मुरूम काढला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर खडी क्रशर केंद्रे असून, त्यांना परवानगी असलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर भागांतूनही गौणखनिजाचा उपसा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
जीपीएसद्वारे उत्खननाची तपासणी करा
अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणांची जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी करून उत्खननाचे क्षेत्र, खोली आणि प्रमाण निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. संबंधित परवानग्या, रॉयल्टी आणि प्रत्यक्ष उत्खनन यांचीही पडताळणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी बाहेरगावी; माफियांचा फायदा?
अपसिंगा परिसरातील अनेक शेतकरी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त लांबच्या गावी राहत असल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत मुरूम उत्खनन केले जात असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी शेतजमिनींचे मोठे नुकसान होत असून, उत्खननानंतर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे भविष्यात त्या जमिनी पुन्हा पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंदफळच्या डोंगरावरही गौणखनिज उत्खनन
सिंदफळ हद्दीतील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौणखनिज अर्थात दगड उत्खनन सुरू असल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे आता भरदिवसाही उत्खनन सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उत्खननाच्या ठिकाणी काम करणारे मजूर अनेकदा स्थानिक परिस्थिती व कायदेशीर बाबींशी अनभिज्ञ असतात. त्यामुळे कारवाईची वेळ आल्यास प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्यांऐवजी मजूरच अडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या संपूर्ण साखळीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
डोंगर खचण्याचा धोका
डोंगरांवर मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याने त्यांची नैसर्गिक रचना कमकुवत होत आहे. पावसाळ्यात पाणी उत्खनन झालेल्या भागात मुरल्यास डोंगर खचणे, मातीची धूप होणे तसेच दरडीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या पंचक्रोशीतील नैसर्गिक संपत्तीचे अशा प्रकारे नुकसान होत असेल तर त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. महसूल, खनिकर्म आणि संबंधित विभागांनी संयुक्त पथकाद्वारे पाहणी करून उत्खननाच्या ठिकाणांचे मोजमाप करावे, परवानग्यांची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विकासकामांसाठी गौणखनिजाची गरज असली तरी त्याच्या नावाखाली डोंगर आणि शेतजमिनी उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी प्रशासनाची कठोर नजर आवश्यक आहे.
