धाराशिव (प्रतिनिधी)-  ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविणे, स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी तसेच सर्वसामान्य ग्राहकांवर होणारा आर्थिक भार याच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले.  ंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी धाराशिव येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी तसेच नागरिक, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान काँग्रेस भवन ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पर्यंत निषेधार्थ रॅली काढण्यात आली. महावितरणमार्फत राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आले आहे.

ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, जिल्ह्यात कोणतेही स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नये, तसेच ज्यांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत त्यांना पूर्वीचे मीटर पुन्हा महावितरणमार्फत बसवून द्यावे, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढलेल्या वीजबिलांची उच्चस्तरीय, स्वतंत्र व तांत्रिक चौकशी करावी, चुकीचे किंवा अवाजवी वीजबिल तात्काळ रद्द करून फेरबिल देण्यात यावे आणि स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तात्काळ मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 
Top