‌धाराशिव (प्रतिनिधी)-   पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळाची सातत्याने झळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प वनक्षेत्र अशी पर्यावरणीय आव्हाने असलेल्या धाराशिव जिल्ह्याने शुक्रवारी हिरवाईच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले. जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी 12 तासांत 10 लाख 7 हजार 975 रोपांची लागवड करून ‌‘हरित धाराशिव 2.0'अंतर्गत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाला लोकसहभागाची भक्कम साथ मिळाल्याने हा उपक्रम केवळ विक्रम न राहता दुष्काळी भूमीवर हिरवाई, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाची नवी आशा रुजविणारी लोकचळवळ ठरला.


दुष्काळी जिल्ह्याची हिरवाईकडे वाटचाल

धाराशिवची ओळख प्रामुख्याने दुष्काळी जिल्हा म्हणून आहे.कमी पर्जन्यमानामुळे शेती,पाणी आणि पर्यावरणासमोरील आव्हाने कायम आहेत.त्यातच जिल्ह्यातील वनक्षेत्र अत्यल्प असल्याने हरित आच्छादन वाढविणे ही काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी सुरू झालेल्या ‌‘हरित धाराशिव' अभियानाला यंदा ‌‘हरित धाराशिव 2.0'च्या माध्यमातून अधिक व्यापक रूप देण्यात आले.मागील वर्षाच्या अनुभवातून निर्माण झालेला लोकविश्वास,प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन आणि विविध विभागांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा विक्रम साकारला.

मागील वर्षी 19 जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती.लावलेल्या रोपांपैकी सुमारे 13 लाख रोपे जिवंत असल्याने यंदाच्या मोहिमेला संवर्धनाचा अनुभव आणि विश्वासाची भक्कम पार्श्वभूमी मिळाली.त्यामुळे यंदा केवळ लागवडीच्या संख्येवर भर न देता रोपांची नोंद,पडताळणी,स्थानिक प्रजातींची निवड आणि पुढील संगोपन यांनाही प्राधान्य देण्यात आले.


आठ ठिकाणी एकाच वेळी हिरवाईचा उत्सव

‌‘हरित धाराशिव 2.0'अंतर्गत जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकूण 33.7 हेक्टर क्षेत्रावर 10 लाख 7 हजार 975 रोपांची लागवड करण्यात आली.सामाजिक वनीकरण विभागाच्या चार ठिकाणी 14.5 हेक्टर क्षेत्रावर चार लाख 35 हजार,वन विभागाच्या तीन ठिकाणी 14.2 हेक्टर क्षेत्रावर चार लाख 26 हजार,तर वन्यजीव विभागाच्या येडशी अभयारण्यातील एका ठिकाणी एक लाख 50 हजार रोपांची लागवड करण्यात आली.

या आठही ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक,महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक,अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था,स्वयंसेवक आणि नागरिकांनी सहभाग घेतला.वन विभाग,सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग,स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केले.आठ ठिकाणी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपजिल्हाधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.


प्रत्येक रोपाचा डिजिटल आणि प्रत्यक्ष ठसा

गिनीज विक्रमासाठी लागवडीची नोंद पारदर्शक आणि पडताळणीय राहावी,यासाठी प्रत्येक रोपाला स्वतंत्र  कोड देण्यात आला. मोबाईल स्कॅनरच्या माध्यमातून रोपाची नोंद करण्यात आली. एकच रोप एकदाच मोजले जाईल, याची दक्षता घेण्यात आली. त्यासोबतच रोपांचे लॉगबुक, सहभागी स्वयंसेवकांचे बुक,दर तासाच्या वृक्षलागवडीची नोंद, ठिकाणनिहाय नोंदी,छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग,ड्रोन शूटिंग आणि स्थिर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.

12 तासांच्या या मोहिमेत वेळ मोजणारे घड्याळ किंवा टायमर थांबविण्यात आला नाही.प्रत्येक तासाची कामगिरी लॉगबुकमध्ये नोंदविण्यात आली. स्वतंत्र वनस्पतिशास्त्रज्ञ आणि त्रयस्थ साक्षीदारांच्या उपस्थितीत नोंदींची पडताळणी करण्यात आली.जास्तीत जास्त चार तासांच्या पाळ्यांमध्ये दोन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि दोन त्रयस्थ साक्षीदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रक्रियेची पाहणी केली.अंतिम टप्प्यातील साक्षीदारांनी पूर्वीच्या नोंदींचे पुनरावलोकन करून अंतिम संख्या निश्चित केली.आठही लागवड स्थळांची पडताळणी सनदी लेखापाल गोपाल लढ्ढा यांच्या सनदी लेखा फर्मकडून करण्यात आली.विविध पुरावे, लॉगबुक,रोपांचे लॉगशीट, छायाचित्रे,व्हिडिओ आणि इतर दस्तऐवज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांना सादर करण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्रयस्थ संस्थांचे साक्षीदार वनस्पतिशास्त्रज्ञ आणि स्वतंत्र निरीक्षक कार्यरत होते.


स्थानिक प्रजातींमुळे जैवविविधतेला आधार

वृक्षलागवड केवळ विक्रमापुरती मर्यादित न राहता भविष्यातील जैवविविधतेला आधार देणारी ठरावी,यासाठी स्थानिक प्रजातींना प्राधान्य देण्यात आले.घनवन पद्धतीनुसार कॅनोपी,मोठे वृक्ष, उपवृक्ष आणि झुडूप अशा विविध स्तरांतील प्रजातींची निवड करण्यात आली.वड,उंबर,जांभूळ, कदंब,चिंच,पिंपळ,आवळा,हिरडा, बेहडा,कडुनिंब,मोह,बकुळ, पळस,बहावा,करंज,शमी,बोर आणि बाभूळ यांसह तुळस, कोरफड,चाफा,मोगरा आणि प्राजक्त यांसारख्या स्थानिक व उपयुक्त प्रजातींचा समावेश करण्यात आला.स्थानिक प्रजातींच्या या मिश्र लागवडीमुळे भविष्यात पक्ष्यांना अधिवास, मातीला आधार,सावली,भूजल पुनर्भरणास मदत आणि स्थानिक जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी केलेली वृक्ष लागवड ही केवळ संख्येची नोंद नसून,भविष्यातील पर्यावरणीय समतोलासाठी केलेली गुंतवणूक ठरणार आहे.


तीन महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन

या विक्रमासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तीन महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन केले होते.जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर यांनी लागवडीसाठी अत्यंत काळजीपूर्वक सूक्ष्म नियोजनातून काम केले.वन, सामाजिक वनीकरण व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले.40 हून अधिक रोपवाटिकांमधून रोपांची निर्मिती करण्यात आली.24 वनस्पतिशास्त्रज्ञ,स्वतंत्र निरीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दुष्काळी परिस्थिती आणि कमी पर्जन्यमान लक्षात घेऊन घनवनासाठी मियावाकी पद्धतीचा वापर करण्यात आला.जिल्हा प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था,विद्यार्थी,शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक,स्वयंसेवक,नागरिक आणि विविध कंपन्यांनी या उपक्रमासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले.


विक्रमापेक्षा मोठे आव्हान आता झाडे जगविण्याचे

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद धाराशिवसाठी अभिमानाची बाब असली,तरी या विक्रमाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे.आज लावलेले प्रत्येक रोप जिवंत ठेवणे,त्याला आवश्यक पाणी देणे,संरक्षण करणे आणि त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर करणे ही पुढील जबाबदारी आहे. 

विक्रमाचा आकडा एका दिवसाचा असतो; मात्र झाडाची सावली, प्राणवायू आणि पर्यावरणीय लाभ अनेक पिढ्यांपर्यंत टिकतात. त्यामुळे वृक्षलागवड ही एका दिवसाची मोहीम न राहता दीर्घकालीन संवर्धनाची लोकचळवळ करण्याचे आव्हान आता जिल्ह्यासमोर आहे.दुष्काळी धाराशिवच्या भूमीवर आज लाखो रोपांच्या रूपाने हिरव्या भविष्याची बीजे रुजली आहेत.प्रशासनाचे नियोजन,विविध यंत्रणांचा समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ‌‘हरित धाराशिव 2.0'ने जिल्ह्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख दिली आहे.आजचा विक्रम कागदावर नोंदला गेला; मात्र उद्या ही लाखो रोपे मोठी होऊन सावली,प्राणवायू आणि जैवविविधतेचा आधार बनली,तरच या हरित पर्वाचे खरे सार्थक होईल.

14 ऑगस्ट रोजी धाराशिवने विक्रम केला; आता या लाखो रोपांनी जिल्ह्याचे पर्यावरणीय भवितव्य बदलावे,हीच या हरित पर्वाची खरी अपेक्षा.


 
Top