धाराशिव (प्रतिनिधी)-  पर्यावरण संरक्षण,हवामान संतुलन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‌‘हरित धाराशिव 2.0' अभियानाअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील 33 हेक्टर क्षेत्रात अवघ्या 12 तासांत 10 लाख वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.या महत्त्वाकांक्षी उपक्रमात शासकीय यंत्रणा,सेवाभावी संस्था,स्वयंसेवक आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

आळणी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत हरित धाराशिव 2.0 अंतर्गत होणाऱ्या 10 लाख वृक्षलागवडीच्या अनुषंगाने रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी पुजार बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वन अधिकारी (प्रा.) जी. एन.येडलावार तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याचे वनक्षेत्र तुलनेने कमी असल्याने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संगोपन ही काळाची गरज आहे. गतवर्षी 15 लाख वृक्षांची लागवड करून जिल्ह्याने नवा विक्रम नोंदविला. यंदा 10 लाख वृक्षांची एकाच दिवशी लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी 86 टक्के झाडे आजही जिवंत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सर्व विभागांच्या परिश्रमांचे कौतुक केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वन अधिकारी (प्रा.) जी.एन.येडलावार यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, गणेश शिंदे, तहसीलदार मृणाल जाधव, अरविंद बोलंगे, प्रकाश म्हेत्रे, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top