धाराशिव (प्रतिनिधी)-  जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकाला दररोज प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यास जलजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.त्यामुळे ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना अद्याप अपूर्ण आहेत. त्या संबंधित कंत्राटदारांकडून तातडीने पूर्ण करून गावे ‌‘हर घर जल' घोषित करण्यासाठी गटविकास अधिकारी व उपअभियंत्यांनी संबंधित सरपंचांसमवेत बैठका घेऊन नियोजन करावे. विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड, जिल्हा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मांजरमकर तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,शासनाने जिल्ह्यातील काही तालुक्यांचा आकांक्षी तालुक्यांमध्ये समावेश केला असून,त्या तालुक्यांतील जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांना प्राधान्य देऊन त्या तातडीने पूर्ण कराव्यात. संबंधित गावे ‌‘हर घर जल' घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.ज्या ग्रामपंचायतींकडून अद्याप दानपत्रे प्राप्त झालेली नाहीत,ती गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने मिळवून घ्यावीत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील योजनाही लवकरात लवकर पूर्ण करून कार्यान्वित कराव्यात. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडदळकर म्हणाल्या की,जलजीवन मिशनच्या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि उपअभियंत्यांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेऊन अडचणी दूर कराव्यात. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कटकधोंड यांनी जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा सादर केला. 

 
Top