धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद्र गोरे यांचे वय 85 वर्ष असून सुद्धा तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते कारखान्याचे कामकाज पाहून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येक कारखान्याच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याने हा कारखाना त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने सहकारातून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांनी केले. 

धुत्ता व पाडोळी येथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित ऊस पीक प्लॉट भेटी देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे, मार्गदर्शन डॉ. तुषार जाधव प्रकल्प समन्वयककृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच तुषार शितोळे, शास्त्रज्ञ कीटक शास्त्र विभाग पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने चांगल्या पद्धतीचा फायदा होत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

डॉ. तुषार जाधव यांनी ऊसाला खत कशा पद्धतीने द्यावे, पाण्याचे नियोजन किती वेळ करावे उसाची बाळ भरणी, मोठी बांधणी कशा पद्धतीने असावी याची सविस्तर माहिती दिली. आणि हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरावे याचे मार्गदर्शन केले. तुषार शितोळे यांनी उसावर येणाऱ्या किडी त्यांना खाणाऱ्या मित्र किडी परिसरामध्ये आढळून येणारी रोगराई याचा प्रतिबंध कसा करावा याची सविस्तर माहिती दिली. कारखान्याचे सर्व संचालक व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top