धाराशिव (प्रतिनिधी)- लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जात आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी दि. 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत चौकशी समिती नेमण्याची कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात ही समिती पूर्ण होईल, असे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पूजार म्हणाले की, तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला जी जमीन इनाम म्हणून दिली होती. याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल मंत्री यांनी याबाबत तुळजापूर इनाम जमीन बाबत चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. मूलत: इनाम जमिन ही निजाम सरकारने वेगवेगळ्या मठास काही अटी शर्ती टाकून दिली होती. यामध्ये मंदिर संस्थानचे सातबारावर नाव नाही. या चौकशी समितीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी असेल. या चौकशीमध्ये जमीन प्रकरणात केलेल्या अटी व शर्तीवर त्याचे पालन होते की नाही याची चौकशी होणार आहे. या चौकशीमध्ये गुंतागुंतीचे विषय लक्षात घेता सखोल चौकशी होईल. असे जिल्हाधिकारी पुजार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र मंदिर महासंघाने दिलेल्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा' देखील लागू होत नाही.
काय आहे प्रकरण
श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या हजारो एकर जमिनीचे कायद्याचे उल्लंघन करून 63.03 एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ' दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे 7/12 वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उपळा या गावांमधील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली आहे. असा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला आहे. त्यामुळे या महासंघाच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य पातळीवरून याची चौकशी होत आहे.
