धाराशिव (प्रतिनिधी)- “भारत सरकारकडून डिझाईन पेटंट प्राप्त होणे ही महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी केले. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत ह. जैन यांना त्यांच्या अभिनव संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
‘आयसोमेट्रिक रेखाचित्रांसाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्पलेट' या शोधनिर्मितीसाठी हा पेटंट मिळाला आहे. अभियांत्रिकी शिक्षण व तांत्रिक रेखांकन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कार्याला नवी ओळख मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांच्या हस्ते डॉ. जैन यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. डी. डी. दाते (अधिष्ठाता (शैक्षणिक) व विभागप्रमुख, यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग), प्रा. ए. झेड. पटेल, प्रा. डी. एच. निंबाळकर, प्रा. ए. बी. भस्मे, प्रा. एस. पी. बिरादार, प्रा. एस. डी. शिंदे तसेच संजय पवार उपस्थित होते. डॉ. जैन यांनी विकसित केलेले ‘आयसोमेट्रिक रेखाचित्रांसाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्पलेट' हे त्रिमितीय रेखाचित्रांमध्ये लंबवर्तुळे अचूक, जलद आणि सुलभ पद्धतीने काढण्यासाठी विकसित करण्यात आलेले विशेष ड्रॉइंग टेम्पलेट आहे. यावेळी डॉ. डी. डी. दाते, समन्वयक प्रा. गणेश भातलावंडे यांनीही जैन यांचे कौतुक केले. माजी गृहमंत्री संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, सर्व विभागप्रमुख यांनी डॉ. जैन यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले.
