भूम/परंडा (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रातील दोन प्रमुख श्रद्धास्थाने असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीक्षेत्र शेगाव यांना रेल्वेमार्गाने जोडण्याची मागणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी भूम-परंडा-वाशी तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू असून, बुधवार, दि. 15 जुलै रोजी पुणे येथे होणाऱ्या मध्य रेल्वेच्या बैठकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हा विषय अधिकृतपणे मांडणार आहेत. 

या मार्गामुळे 12 जिल्ह्ये व राज्यातील 19 तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत. राज्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित भागातील खासदार या बैठकीस उपस्थित राहणार असल्याने या बैठकीकडे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि लाखो भाविकांचे लक्ष लागले आहे.मराठवाडा हा संतांची भूमी, ऐतिहासिक वारसा, धार्मिक परंपरा आणि समृद्ध संस्कृतीसाठी देशभरात ओळखला जातो. वारकरी संप्रदाय, जैन धर्म, विविध देवस्थानांची परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे यांमुळे या प्रदेशाला वेगळे महत्त्व आहे. मात्र, रेल्वे संपर्काचा अभाव हा या प्रदेशाच्या विकासातील मोठा अडथळा ठरला आहे. 


हे तीर्थक्षेत्र जोडले जातील

प्रस्तावित पंढरपूर-शेगाव रेल्वेमार्ग हा अनुशेष दूर करणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो.हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास महाराष्ट्रातील दोन महान श्रद्धास्थाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर आणि श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव थेट रेल्वेमार्गाने जोडली जातील. या मार्गावर जैन धर्मियांचे दक्षिणेची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले कुंथलगिरी तीर्थक्षेत्र, सोनारीचे जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ मंदिर, तसेच परिसरातील अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना देशभरातील भाविकांसाठी सहज पोहोचता येईल. तसेच जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ अजिंठा वेरूळ,राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान,संत मुक्ताई हे धार्मिक स्थळ,दक्षिणेची काशी अशी ओळख असणारे पैठण हे देशाशी जोडले जाणार आहे. बुधवार दिनांक 15 रोजी पुण्यात होणाऱ्या मध्य रेल्वेच्या बैठकीत या मागणीची सकरात्मक दखल घेतली गेल्यास मराठवाड्याच्या विकासाच्या इतिहासात नवे पर्व सुरु होईल अशी अशा संपूर्ण मराठवाड्याला लागून राहिली आहे.

 
Top