तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी घडलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे माजी सैनिक तालुकाध्यक्ष श्रीकांत सौदागर गाटे यांनी काटी  ग्रामपंचायत हद्दीतील कथित अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी अनेक महिने प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

काटी येथील सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमण हटविण्याबाबत श्रीकांत गाटे यांनी यापूर्वी अनेक वेळा लेखी निवेदने दिली होती. ग्रामपंचायतीला नोटिसा, आदेश आणि पाठपुरावा होऊनही प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला होता. प्रशासनाने वारंवार आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्ष कृती न झाल्याने अखेर न्याय मिळविण्यासाठी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बुधवारी सकाळी पंचायत समिती कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही श्रीकांत गाटे यांनी मोठ्या शिताफीने गटविकास अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत अंगावर पेट्रोल ओतले आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत आणि संबंधित ग्रामसेवकांच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध करत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. काही क्षणांसाठी संपूर्ण कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेव यांनी श्रीकांत गाटे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. संबंधित ग्रामसेवकांना अतिक्रमणासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित पक्षकार यांना दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. याबाबतचे लेखी पत्रही श्रीकांत गाटे यांना देण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय नियमांनुसार अतिक्रमणाच्या प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच भविष्यात अशा प्रकारचे टोकाचे आंदोलन करू नये, अशी विनंतीही त्यांनी श्रीकांत गाटे यांना केली.

 
Top