धाराशिव (प्रतिनिधी)-   कळंब शहरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी सोमवारी (दि.13) धाड टाकून दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध मानवी अनैतिक व्यवसाय (प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल फोन, नोंदणी रजिस्टर आणि अन्य साहित्य असा एकूण 16 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. गस्ती दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत प्रभात लॉजमध्ये महिलांकडून देहव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर सायंकाळी सुमारे 4.30 वाजता प्रभात लॉजवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान दोन महिला आढळून आल्या. महिला पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता आरोपी समाधान महादेव कांबळे (रा. इंदिरानगर, कळंब), अमोल राजाभाऊ सोनटक्के (वय 36, रा. हासेगाव, ता. कळंब) आणि नरेश खेमराज जोशी (रा. बसस्थानकासमोर, कळंब) यांच्या सांगण्यावरून त्यांना वाणिज्यिक उद्देशाने आश्रय देऊन लैंगिक शोषणासाठी प्रवृत्त करण्यात येत असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी तात्काळ दोन्ही महिलांची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, लॉजचे नोंदणी रजिस्टर, 6 हजार 200 रुपयांची रोख रक्कम, निरोधची पाकिटे असा एकूण 16 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी समाधान महादेव कांबळे, अमोल राजाभाऊ सोनटक्के आणि नरेश खेमराज जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 298/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(3), 144(2) तसेच मानवी अनैतिक व्यवसाय (प्रतिबंधक) अधिनियम कलम 3, 4, 5 व 6 अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


 
Top