भुम (प्रतिनिधी)- भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध शेतकरी व सिंचनविषयक मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी (महसूल), भूम यांच्यामार्फत देण्यात आले.

निवेदनात मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंजूर असलेली 21 टीएमसी पाणी योजना तातडीने पूर्ण करावी आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. उजनी धरणातून मराठवाड्यासाठी राखीव असलेल्या 21 टीएमसी पाण्याचा लाभ भूम, परंडा, वाशी तसेच बीड व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी भूम तालुक्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आवश्यकता निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

तसेच, यंदा मराठवाडा व विदर्भात अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांच्या पेरणीवरील खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा शेतकरी हिस्सा केवळ 1 रुपया ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय,सन 2025 च्या खरीप हंगामात पीक विमा उतरविलेल्या अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊनही विमा भरपाई मिळालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विमा कंपन्यांनी बदललेल्या निकषांचा आधार घेत नुकसानभरपाई टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, वास्तविक नुकसानीचा विचार करून नव्याने निकष निश्चित करावेत व बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भूम तालुका काँग्रेस कमिटीने व्यक्त केली आहे.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.सिराज मोगल धाराशिव एन एस यु आय चे  जिल्हाध्यक्ष ॲड.मुशरफ सय्यद, माजी नगरसेवक सोपान वरवडे युवक काँग्रेसचे मोईज सय्यद भूम तालुका उपाध्यक्ष ॲड.घनश्याम लावंड महमूद पटेल महादेव जाधव बादशाह शेख दत्तात्रय शिंदे उत्तरेश्वर डोंबाळे याच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top