धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे जिल्हा न्यायाधीश चेतन भागवत साहेब यांनी स्वतःहून न्यायदान प्रक्रियेपासून फारकत घेऊन न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी येथून पुढे अधिकृतरित्या रिटायरमेंट घेऊन हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीपासूनच वकिली क्षेत्रांमध्ये जास्त इंटरेस्ट असल्याने त्यांनी सुरुवातीला कै. ॲड. दत्तात्रय बारखडे आबा यांच्या ऑफिसला कामकाज केले होते. जूनियर म्हणून त्यांनी आबांच्या सोबत चांगल्या पद्धतीने कामकाज करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर न्यायदान क्षेत्रामध्ये सुद्धा 22 वर्ष त्यांनी न्यायदान देऊन चांगल्या प्रकारे आपली ओळख निर्माण केली होती.
आता सध्या स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर पुणे येथे डेक्कन भागात भांडारकर इन्स्टिट्यूट समोरच कार्पोरेट ऑफिस चालू करून उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्याचा निर्णय चेतनजी भागवत साहेबांनी घेतला आहे. ऑफिसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी तसेच सहकारी मित्र बंधू ॲड. जयंतजी देशमुख सहाय्यक सरकारी अभियोगता, तसेच ॲड. अभय पात्रुडकर साहेब पॅनल ॲड. लीगल एड उपस्थित होतो. भागवत साहेबांनी आवर्जून सांगितले की मी कोणत्या देवाचा सुद्धा फोटो माझ्या या ऑफिसमध्ये लावला नाही.
फक्त आबांचा फोटो लावला आहे. आबा माझ्यासाठी देवाप्रमाणेच होते. निस्वार्थपणे त्यांनी मला ज्ञान दिले, काम करण्याची न्यायालयामध्ये वकिलीत असताना संधी आबामुळेच मला मिळाली आणि त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी पोहोचू शकलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आजही आबांविषयीची असणारी त्यांची कृतज्ञता या फोटोमध्ये त्यांच्या कृतीतून तसेच विचारातून दिसून आली. त्यांच्या ऑफिसमध्ये फक्त एकच फोटो आहे आणि तो आबांचा. चेतनजी भागवत साहेबांच्या या कृतीतून सीनियर ज्युनिअर यांच्यातील असलेली स्नेहभावना आजही ठळकपणे दिसून आली. हा समृद्ध वारसा आपल्या धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचा असून सीनियर ला असे ज्युनियर मिळणे आणि जूनियर च्या मनात सीनियर विषयी असा भाव गुरुचा कायम स्मरणात राहणे निश्चितच आनंदाचे आणि समाधानाचे काम आहे. चेतनजी भागवत साहेब निवृत्त न्यायाधीश पुणे यांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील येथून पुढच्या काळात यश मिळो, समृद्धी मिळो, उत्तम आरोग्य लाभो या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
