कळंब (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षणासाठी निधी मागणीनुसार उपलब्ध होणार असतानाही कळंब येथे प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे 120 शिक्षक-शिक्षिकांना चहा, जेवण आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता तिसरीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण दि. 15 ते 18 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन केंद्रांवर आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची शाळा) येथे 55 शिक्षक प्रशिक्षणासाठी आणि भैरवनाथ अध्यापक विद्यालय, ढोकी रोड येथे 65 शिक्षकांचे हे प्रशिक्षण सुरू आहे. ईटकूर, गौर, आंदोरा, येरमाळा, मोहा, शिराढोण, पाडोळी, गोविंदपूर, लोटा पूर्व आणि कळंब शहर परिसरातील जवळपास 120 शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
शासनाच्या नियमानुसार प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना दोन वेळचा चहा, दुपारचे जेवण, आवश्यक स्टेशनरी तसेच प्रशिक्षण देणाऱ्या तज्ज्ञांना मानधन देण्याची तरतूद आहे. मात्र कळंब आणि वाशी येथे ही मूलभूत सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली नाही. दिवसभर प्रशिक्षण घेऊनही शिक्षकांना स्वतःच्या खर्चाने चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करावी लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कळंब आणि वाशी येथे पुरवठादार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या दोन शहरातील दोन केंद्रांवर चहा व जेवणाची व्यवस्था करता आली नाही. मात्र जिल्ह्यातील इतर सहा प्रशिक्षण केंद्रांवर ही व्यवस्था करण्यात आली आहे.
प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव
या व्यवस्थेची सर्व जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या नियोजनुसार हे प्रशिक्षण चालते त्यात आमचा कुठलाही संबंध नाही.
- संतोष माळी गटशिक्षणाधिकारी कळंब.
